Ahmednagar News : शॉर्ट सर्किटमुळे कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यात शेतकरी डॉ. प्रसाद होन यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसानीची पाहाणी करून तात्काळ मदत द्या, अन्यथा महावितरणच्या कारभाराविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे बंधू अॅड. मधुकर होन यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चांदेकसारे येथील डॉ. प्रसाद राजाभाऊ होन यांच्या तीन एकर ऊसाला काल मंगळवारी (दि. १२) महावितरण कंपनीच्या लोंबकळत असलेल्या तारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली.
यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अनेकदा या लोमकळत असलेल्या तारा ओढण्याचे व रोहित्र बदलीचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले असतानादेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच ऊस पेटला. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
झगडेफाटा- रांजणगाव रोडदरम्यान होन यांची ३५ एकर जमीन आहे, सर्व्हे नंबर १६० मध्ये त्यांनी उसाची लागवड केली होती. गळीतास आलेला ऊस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला तुटून जाणार होता; मात्र अचानक शार्टसर्किटने हा ऊस पेटला. होन व त्यांच्या मजुरांच्या ऊस पेटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना आवाज देऊन बोलविले.
कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक अॅड. राहुल होन, शंकरराव चव्हाण, सहकार महर्षीकोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संजय होन, बाजीराव वक्ते, साहेबराव होन, बारकू होन, सिताराम मोरे, राधाजी होन, डॉ. प्रसाद होन, राजाभाऊ होन यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाणी केली.
आजूबाजूला शंभर ते सव्वाशे एकर ऊस असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी अॅड. राहुल रोहमारे यांनी कर्मवीर काळे कारखान्याचे अग्निशमन बंब बोलावले. तर संजय होन यांनी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अग्निशमन बंब बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. मात्र होन यांचा ऊस जळून खाक झाला.
निष्काळजीपणामुळे ऊस’ पेटण्याचे सत्र चालू
डॉ. प्रसाद द होन यांनी वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तारा ओढण्याची सूचना केली होती. तरीदेखील त्यांनी तारा ओढल्या नाही. त्यामुळे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ऊस पेटण्याचे सत्र चालू असल्याचे होन यांनी सांगितले.
जीवापाड कष्ट करून आपल्या शेतात पिकवलेले पीक जर असे हातातून जात असेल, तर आता शेतकरी शांत बसणार नसल्याचे अॅड. मधुकर होन यांनी सांगितले.