Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस जळाल्याची घटना नुकतीच घडली. पेटलेला ऊस विझविण्यासाठी अग्निशामक सेवा उपलब्ध न झाल्याने अखेर कुटुंबियांनी व लगतच्या काही शेतकऱ्यांच्या मदतीने त्यातील केवळ अर्धा एकर ऊस वाचवला, तरी आता सध्या कुठलाच कारखाना सुरू नसल्याने हा ऊस तोडून जावू शकत नसल्याने या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
खोकर गावालगत असलेल्या चव्हाण वस्तीपासून काही अंतरावर अभिजीत कारभारी चव्हाण यांचा तोडणीला आलेला साडेतीन एकर ऊस आहे. याच क्षेत्रात महावितरणचे रोहित्र आहे.
या रोहित्रावर रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शार्टसर्कीट होवून खाली असलेल्या उसात आगीच्या ठिणग्या पडल्याने उसाने पेट घेतला. हा प्रकार काही वेळानंतर शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरडा करून मदतीसाठी धावा केला.
दरम्यान, काहींनी अशोक कारखान्याच्या अग्निशमन सेवेशी संपर्क केला. परंतु गाडीचा बिघाड झालेला असल्याचे समजले. त्यानंतर श्रीरामपूर नगरपरिषदेशी संपर्क केला असता, तेथेही संपर्क होवू शकला नाही.
शेवटी भर उन्हात निलेश चव्हाण यांनी आपल्या बागेत फवारणीसाठी असलेल्या ट्रॅक्टरवरील पंम्पाच्या मदतीने व इतरांच्या मदतीने ऊस विझविण्याचा प्रयत्न केला. यात बराच काळ गेल्याने तोपर्यंत सुमारे तीन एकर उसाची होळी झाली.
याप्रसंगी पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण, अभिजीत चव्हाण, नंदकुमार चव्हाण, निलेश चव्हाण, अमोल कणगरे, बाबासाहेब राजपूत, रमेश कचरे, धुळेश्वर कचरे व पार्वतीबाई शिंदे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.
संबंधीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान होवूनही महावितरणने या प्रकाराची रविवारी सायंकाळपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही. या शेतकऱ्याचे सांत्वन करण्यासाठी किंवा नुकसानी पाहणी व पंचनामा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.