Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा येथे विषबाधा झाल्याने तीन गायी दगावल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की चांदा येथील ज्ञानदेव हरिभाऊ जावळे हे चांदा ते रस्तापूर रोडलगत गट नंबर २७४/७५ येथे वस्तीवर राहतात.
त्यांच्या तीन गायींना विषबाधा होऊन त्या दगावल्या. यात जावळे परिवाराचे मोठे नुकसान झाले. शेतीसाठी जोड धंदा म्हणून शेतकरी गायी पाळतात व त्या पोटी अर्थिक उलाढाल करतात. ज्ञानदेव जावळे यांची एक दुभती व दोन चार महिन्याच्या गाभन अशा तीन गायी अंदाजे दीड लाख रुपये किंमतीच्या होत्या.
विषारी गवत खाण्यात आल्याने त्या दगावल्या असल्याचा अंदाज वडाळा बहिरोबा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज अभाळे व चांदा येथील पशूवैद्यकीय अधिकारी धर्माजी फोपसे यांनी व्यका केला. शेतकऱ्यांनी गोठ्याशेजारी स्वच्छता ठेवली पाहिजे,
तसेच रात्रीच्या वेळेस चारा झाकून ठेवताना त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या विषारी सर्प जाणार नाही व चारा विषारी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. आभाळे व डॉ. फोपसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
तसेच ज्ञानदेव जावळे यांना शासनाने जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.