Ahmednagar News : नगरमध्ये पीएम किसान योजनेचे तीन तेरा ! अर्ज घ्यायला कर्मचारीच नाही, प्रक्रियाही बंद, ४२ हजार लाभार्थ्यांची संख्या आली ९ हजारांवर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी अनेक योजना देखील कार्यान्वयीत केल्या. यातीलच एक महत्वाची म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’.

या योजनांतर्गत सरकार शेतकऱ्यांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रति हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करते. ही योजना अतिशय उत्तम असली तरी नगर जिल्ह्यात सध्या या योजनेसह अगदी तीन तेरा झाले अशी अवस्था झाली आहे.

या योजनेत समाविष्ट होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात कोणीही कर्मचारी नसल्याने या योजनेची प्रक्रियाच सध्या बंद पडली असल्याचेच सध्या चित्र आहे.

सरकारने आता या योजनेच्या नियमात थोडा बदल करून शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द करून सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरवली. परंतु २०१९ पूर्वी ज्यांच्या नावावर जमीन होती, सध्या त्यांनाच याचे नियमित हप्ते मिळत आहेत. २०१९ नंतर शेतजमिनी घेतलेल्या लाभार्थ्यांना याचा अजून लाभ मिळत नाही.

दरम्यान कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे लाभार्थ्यांना कसलीही प्रोसेस सध्या करता येत नाही. कृषी कार्यालयांत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. ज्यांच्याकडून किसान योजनेचे काम यापूर्वी करून घेतले गेले त्यांचे पगार करण्यासाठीही निधी नाही.

यामुळे योजनेच्या नवीन नोंदणीचे काम ठप्प आहे अशी माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. तालुक्यातील ज्या एजन्सीकडे या योजनेत शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याचे काम होते,

त्या एजन्सीचा करार दि. ३१ मार्चला संपल्याची माहिती मिळाली. यामुळे सध्या जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात जात आहेत त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

लाभार्थ्यांच्या संख्येतही झालीये मोठी घट

नगर तालुक्यात पूर्वी असणारे लाभार्थी व आताचे लाभार्थी यांत मोठा फरक जाणवत आहे. मोठी घट या लाभार्थ्यांमध्ये झाली आहे. सुरवातीला तब्बल ४२ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता तर आता तेरावा हप्ता केवळ ९ हजार ८०० शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. यातूनच लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe