कापूस व्यापाऱ्यास लुटणारे तिघे जेरबंद ! स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील एका कापूस व्यापाऱ्याची पैशाची बॅग लुटणारे ३ आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर पथकाला यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.७) डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी रामेश्वर गिरजीनाथ लोखंडे (रा. मालुंजा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या टाकळीभान येथील कापूस खरेदीच्या दुकानासमोर बसलेले होते.

तेव्हा त्यांच्या जवळील ३ लाखांची बॅग एक इसम घेऊन गेल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु सदर इसम तेथून त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवर बसून पळुन गेला. सदर घटनेबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीची माहिती काढत असताना (दि.२४) रोजी पोलीस पथकास सदरचा गुन्हा आरोपी अभिजीत बळी (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याने त्याच्या साथीदारांसह केल्याची व ते टाकळीभान येथील एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने तात्काळ टाकळीभान येथे जाऊन त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. अभिजीत गणपत बळी (रा. भोकर, ता. श्रीरामपूर), अंकुश दत्तात्रय बहिरट (रा. घोगरगाव, ता. नेवासा), इकबाल सिकंदर शेख (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), असे त्यांची नावे आहे.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी साथीदार विवेक लक्ष्मण शिंदे (रा. टाकळीभान), लखन नंदु काळे (रा. नेवासा) यांना टाकळीभान येथील कापूस व्यापाऱ्यावर पाळत ठेऊन व अंकुश बहीरट, लखन काळे यांनी शाईन मोटारसायकलवरुन पैशाची बॅग घेऊन पळुन गेल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे रोख रक्कम, मोबाईल, असा एकुण १ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहे.