अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- सोशल मिडीयावरील फेसबुकवर एका तरूणाने दुसर्या व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार केले. त्यावर तरूणीसह तिच्या भावाचे फोटो व अश्लिल मेसेज पोस्ट करून त्यांची बदनामी केली.
याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करत बनावट खाते तयार करणारा तरूण प्रमोद किसन पावसे (रा. इंदापूर जि. पुणे) याला अटक केली आहे. प्रमोद पावसे याने फेसबुकवर एका व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार केले होते.
त्याने फेसबुक, इंस्टाग्राम अशा अॅपवरून अहमदनगर जिल्ह्यातील एका तरूणीसह तिच्या भावाचे फोटो प्राप्त केले. ते फोटो त्याने फेसबुकवर तयार केलेल्या बनावट खात्यावर टाकले.
त्या फोटोबरोबर अश्लिल मेसेज पोस्ट केले. हा प्रकार त्या तरूणीच्या लक्षात येताच त्यांनी 8 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी भादंवि कलम 354 (अ), 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी प्रमोद पावसे याला इंदापूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली.
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान येथील सायबर पोलीस ठाण्याकडून सन 2021-22 या वर्षात व्हाट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मिडीया संदर्भातील गुन्ह्यात नऊ पुरूष, तीन महिला यांना अटक केली आहे.
तसेच सहा अल्पवयीन मुले देखील अशा गुन्ह्यात निष्पन्न झाले आहेत. सोशल मिडीयावर बदनामी केल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल होत आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आव्हान सायबर पोलिसांनी केले आहे.