अहमदनगर बातम्या

दूध दराच्या प्रश्नावर सरकारी हस्तक्षेपाची वेळ आलेली आहे – आमदार बाळासाहेब थोरात

Published by
Ahmednagarlive24 Office

दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल मंगळवारी भेट घेतली. उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचीही विनंती त्यांनी केली.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, दुधाचा विषय हा गरीब माणसाच्या अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. २५ ते २८ रुपये लिटरने गायीचे दूध विकणे शेतकऱ्यांना परवडू शकत नाही.

शासनाने या विषयावर सामोपचाराने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. दूध दराच्या प्रश्नावर सरकारी हस्तक्षेपाची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना किमान ३४ रुपये लिटरप्रमाणे दुधाचा भाव मिळण्यासाठी गरज पडल्यास सरकारने मदत करावी.

यापूर्वी ३४ रुपये असलेला दर २५ रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. जेव्हा दुधाचे भाव वाढतात तेव्हा गायीच्या खाद्याचेही भाव वाढतात. आता जेव्हा दुधाचे भाव कमी झाले तेव्हा २५ ते २८ रुपये लिटरच्या दरम्यान दुधाची निर्मिती करणे उत्पादकांना शक्य होणार नाही.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अशा काळात दिलासा देणे ही शासनाची जबाबदारीच आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर सरकार आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर निर्माण होतो, असेही थोरात म्हणाले.

आमदार थोरात यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून या विषयाचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन करून, अकोले येथे सुरू असलेले उपोषण तातडीने थांबविले जावे, यासाठी पुढाकार घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, असा आग्रह धरला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, मंदा नवले, आरिफ तांबोळी, शिवाजी नेहे, महेश नवले, संदीप शेनकर, डॉ. मनोज मोरे, गणेश पापल आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office