अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- ऐन सणासुदीच्या काळात दिवाळी सणापूर्वीच किराणा मालासोबतच सुकामेव्याच्या किमतीत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात इम्युनिटी वाढीसाठी सुका मेवा वापरात वाढ झाली.
परिणामी ७०० ते ८०० रुपये किलो असलेला बदाम आता ११०० ते १२०० रुपये किलो ने तर काजू ९०० ते ११०० रुपये दराने विकले जात आहेत.
खरीप हंगामातील पिके येण्याच्या बेतात असतानाच कडधान्ये ,खाद्यातेल व इतर किराणा मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणारी ठरत आहे.
ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात घरगूती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने महिला त्रस्त झाल्या असतानाच दुसरीकडे किराणा मालाच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
डिझेलचे दर गेल्या चार महिन्यांत वीस रुपयांनी वाढल्याने वाहतुकीचे दरही वाढले आहेत.त्याचा अप्रत्यक्ष परिणाम किराणा मालावर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर झाला आहे.
किराणा मालाचे दर वाढल्याने आगामी काळात येणारे सण कसे साजरे करावेत? या चिंतेत सर्व जण असून गणेशोत्सव, पितृपक्ष, दसरा, दिवाळी हे सण असल्याने किराणा मालाचे दर असेच वाढत राहिल्यास ऋण काढून सण करण्याची वेळ येऊ शकते.
इंधन दरवाढीने नागरिक हैराण असताना खाद्यतेल व डाळींचे दरही वाढले आहेत. शेंगदाणे व दाळींनी शंभरी पार केली आहे आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नागरिकांना आता महागाईचे चटके नकोसे झाले आहेत. महागाईवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसून व्यापारी नफा मिळविण्याच्या तयारीत आहेत.
आयातीवरील कर व कमी उत्पादन यामुळे भाव वाढल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल ही भीती व अफवेमुळे तर महगाई भडकली नाही ना? अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे.