सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारत दिला जीव

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- एकीकडे देशात महिला सन्मानाच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे महिलांचा छळ केल्याच्या घटना घडताना दिसत आहे. दरदिवशी या छळाला कंटाळून पीडित महिला आपली जीवनयात्रा संपवीत आहे.

जिल्ह्यात घडत असलेल्या या घटनांमुळे नगर जिल्हा मोठ्या प्रमाणावर बदनाम होत आहे. यातच पुन्हा एकदा सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील सारोळा बद्धी येथे ही घटना घडली. ज्योती अमित हजारे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मयत ज्योती हिचा विवाह अमित हजारे याच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून पीडितेस हुंड्याच्या कारणावरून सातत्याने मारहाण होत. काही दिवस पीडितेस माहेरी हाकलून दिले. पुन्हा सासरी परतल्यानंतर तिची छळवणूक करण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ज्योती व अमित यांचा वाद दिलासा सेलकडे गेला. तेथे समझोता झाल्यानंतर ज्योती व अमित पुन्हा संसार करू लागले. परंतू, एक दिवस ज्योतीने तिच्या वडिलांना फोन करून सांगितले की, मला सासरच्या लोकांकडून त्रास होत आहे. असे जगणे असाह्य झाले आहे.

यानंतर ज्योती हीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पिडीतेचे वडिल ज्ञानदेव त्रिंबक जावळे (रा. माळीचिंचोरा ता. नेवासा) यांनी सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमित दिलीप हजारे, सासू मंदाबाई दिलीप हजारे, सासरे दिलीप एकनाथ हजारे (सर्व रा. सारोळा बद्धी ता. नगर) यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24