अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी (ता.14) सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी वैष्णवी प्रसाद शिंदे (रा.हिवरगाव पावसा) हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले.
त्यानंतर गेले अनेक दिवसांपासून मयत तरुणीचा पती प्रसाद दादा शिंदे, नणंद ज्योती फुलचंद पांडे (दोघेही रा.हिवरगाव पावसा) व दुसरी नणंद सरिता भागवत पांडे (रा.कासारा दुमाला) यांनी घरगुती कारणांवरून पीडितेस वेळोवेळी मारहाण,
शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करायचे. या जाचाला कंटाळून वैतागलेल्या वैष्णवी हिने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती व दोघी नणंद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आय.ए.शेख हे करत आहे.