Ahmednagar News : वाघोली येथील तीनशे ते साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचे काम तत्काळ व्हावे, आमदार, खासदार यांच्याकडून या कामासाठी निधी मिळावा. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्यावतीने प्रा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटून गेली तरी लोकांना जाण्यायेण्यासाठी नदीवर पूल होत नसेल, महिला, आजारी माणसं, शाळकरी मुलं आणि काही वेळेस प्रेतही नदीच्या पाण्यातून उचलून न्यावी लागत असेल तर हा लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आहे.
दहा वर्षे भाजपचे आमदार, भाजपचे खासदार, आणि गावची सत्ताही दहा वर्षे भाजपच्याच ताब्यात असताना जाण्यायेण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत असेल तर ही भूषणावह बाब नाही.
तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पद अडीच वर्षे, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीवर तालुक्यातील भावी आमदार तरीही पुलासाठी निधी नाही, येत्या पंधरा दिवसांत वाघोली येथील कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलासाठी निधीची तरतूद झाली नाही.
तर लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी राहुटी टाकून मुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी दिला आहे.
कुरण वस्तीवरील शाळकरी मुले, महिला, ग्रामस्थ व वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून तीन तास आंदोलन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निधी मिळावा, यासाठी केलेल्या शिफारस पत्रासह शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते पाण्यातून बाहेर आले.