अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरातील संजयनगर, सुभाषनगर व बैलबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या बंदिस्त रहिवास क्षेत्रात किंवा लगतच्या पत्रा शेड/बंदिस्त पत्रा, कुंपण भिंतमध्ये होत आहे.
यापूर्वी वेळोवेळी गोवंश हत्या विरोधी संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तत्काळ गोवंश हत्या बंद करावी,
अशी मागणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. शहरातील गोवंश हत्या विरोधात विविध हिंदू सामाजिक संघटना यांनी अलीकडच्या काळात निवेदनाद्वारे पोलीस,
महसूल व नगरपरिषद प्रशासनास ही बाब लक्षात आणून दिलेली आहे. वास्तविक कारवाई करण्याचे अधिकार पूर्णत: पोलीस प्रशासनास असतानाही ते राजकीय मंडळींच्या दबावापोटी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
नगरपरिषदेने शहरालगतच्या मनाई परिसरात कत्तलखान्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याठिकाणी म्हैसवर्गीय प्राण्यांची मर्यादित कत्तल करण्याबाबत प्रचलित अधिनियमातील विहित कार्यवाही करून सुविधेचा लाभ घेण्याबाबत संबधित खाटिक व्यावसायिकांना आवाहन करण्यात आलेले आहे.
त्याबाबत काही खाटिक बांधवानी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु शहरातील काही कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या खाटिक लोकांनी कायद्यातील तरतुदीस फाटा देऊन घरामध्ये बंदिस्त जागेत राजरोस कत्तल करत असल्याबाबतची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सदरच्या संजयनगर परिसरातील बहुतेक मिळकतीचे बांधकामे हे अनधिकृत आहेत. सदर ठिकाणी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात धाडसत्र/सर्च ऑपरेशन करून सदरची अवैध कत्तल रोखण्याकारीता आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी, अशी मागणी वहाडणे केली आहे.