Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे शेड उभे करून उभारलेल्या टोलनाक्यालाच आडवे दांडके टाकल्याने हा टोलनाका आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
याबाबतची समजलेली माहिती अशी की, नगर-पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मराठवाडी, ता. आष्टी, या ठिकाणी टोलनाका उभारण्यात आलेला आहे.
या महामार्गावरून धावणाऱ्या चारचाकी वाहनांसह इतर वाहनांकडून या ठिकाणी टोल वसूल केला जाणार आहे. टोल उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे, रस्त्याचे काही ठिकाणी राहिलेले अर्धवट काम पूर्ण झाल्यानंतर लगेच हा टोलनाका सुरू होणार आहे; परंतु टोलनाका सुरू होण्याअगोदरच येथील एका शेतकऱ्याने महामार्ग विभागाने अधिक ग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला दिला नाही,
म्हणून टोल फनाक्याच्या मुख्य मार्गावरच पत्र्याचे शेड उभे करत टोलनाकाच अडचणीत आणण्याचे काम केले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यासंदर्भात शेतकरी दिलीप मराठे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, माझी दहा गुंठे जमीन अधिग्रहण करण्यात आली असून, त्यापैकी सात गुंठयाचे पैसे मला मिळाले. मात्र, तीन गुंठ्यांचे पैसे मला आद्यपही मिळालेले नाहीत, याबाबत वारंवार प्रशासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा केला; परंतु त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मी माझ्या जागेवर पत्र्याचे शेड उभे केले आहे.