अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- औरंगाबाद महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टोल बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता ती गाडी सोडण्यात आली.
टोलनाक्यावर पैसा जमा केला जातो, तो जनतेच्या सेवेसाठी असून जर जनतेच्या सेवेसाठी तो वापरला जाणार नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष कधीही सहन करणार नाही, अशी भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी मांडली.
नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघातामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. याला जबाबदार असणारे अधिकारी मात्र, याकडे कानाडोळा करून संबंधित ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही.
ही कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्यांवर निष्पापांचे बळी घेतले म्हणून गुन्हे दाखल करावे लागतील, अशी भूमिका या ठिकाणी प्रहार कडून मांडण्यात आली.
नियमावलीनुसार किती दिवसात काम पूर्ण करणार आहोत? याचे लेखी द्यावे. परंतु ते लेखी देण्यासाठी अधिकारी तयार झाले नाही. त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे म्हणणे होते, जे नियमात लिहिलेले आहे ते कामे पूर्ण करून देतो.
अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात कुठलाही समन्वय नसल्याने सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची दखल न घेतल्यास कायमस्वरूपी टोल बंद करणार ,असा इशारा पोटे यांनी दिला आहे.