अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरात एका भामट्याने पोलीस असल्याचे सांगत ५६ हजार रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारभारी पुंजीराम पानसरे (वय ७० रा. गोविंदनगर ता. संगमनेर) हे बुधवारी सकाळी शेतकी संघाच्या गेटजवळ आले होते.
त्यावेळी मोटारसायकल वरून दोन युवक त्या ठिकाणी आले आणि त्यांना म्हणाले, आम्ही पोलीस असून रात्री आम्ही गांजा पकडला आहे. त्याची तपासणी सुरु आहे.
तुमच्या जवळील सोन्याचे दागिने व वस्तू पिशवीत टाका असे त्यांनी सांगितले. पिशवीत दागिने टाकल्यानंतर पिशवीतून दागिने काढून घेतल्याचे पानसरे यांच्या लक्षात आले.
याबाबत विचारणा केली असता चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चोरट्यांनी 24 हजाराची सोन्याची चैन व 32 हजाराच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत कारभारी पानसरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून या दोन अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहेत.