शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील आंबड येथे रुपवेते बोलत होत्या. अकोले तालुक्यातील गावात जाऊन मतदारांच्या भेटी घेत प्रचार फेरी काढून मतदारांना त्यांनी आवाहन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या प्रश्नांची आपल्याला जाण असून केंद्राशी निगडित अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत.

दुर्दैवाने या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास गोदावरी खोऱ्याची तूट भरून निघेल. जवळपास १० ते १२ टीएमसी पाणी वळविले जाईल. दरवर्षी जायकवाडीला पाणी सोडण्यावरून वाद होतो. यावर कायमसवरुपी तोडगा निघेल. तूट भरून निघाल्याने अजूनही काही ठिकाणे अशी आहेत की, जिथे पाणी अडविता येईल.

पाणी उपलब्धता प्रमाण पत्र मिळाले की हाही प्रश्न निकाली लागेल. शिर्डी हे जागतिक पातळीवरचे तीर्थक्षेत्र असून त्याच्या विकासाला चालना देताना अकोले तालुका यास पर्यटनाचे पॅकेज मिळाले, तर येथील पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल.

इथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. पोस्ट ऑफिसचे आधुनिकीकरण करून सर्व सामान्य नागरिकांना अल्प दरात सुविधा उपलब्ध होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत चंद्रकांत सरोदे, शांताराम संघारे, किशोर रूपवते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe