वाहतुकीचा बोजवारा उडाला; पोलीस मात्र पावत्या फाडण्यात व्यस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात बेशिस्त वाहतूक चालकांमुळे तसेच उदासीन पोलीस प्रशासनामुळे वाहतूक कोंडी सातत्याने निर्माण झालेली पाहायला मिळते. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे.

दरम्यान श्रीरामपूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढू लागले आहे. शहरातील चौकांमध्ये सिग्नल बंद राहिल्यास व पोलीस नसल्यास वाहतूक सुरळीत राहते असा वाहनचालकांचा अनुभव आहे.

गर्दीच्या वेळेला सिग्नलचे पालन करताना चारही बाजूंनी वाहन चालक संपूर्ण रस्ता व्यापून टाकतात. त्यामुळे डाव्या बाजूने जाणार्‍या वाहनांना जाता येत नाही.

चार ही बाजूने डाव्या बाजूने जाण्यासाठी गाड्यांना रस्ता मोकळा ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असताना पोलीस मात्र रस्त्याच्या कोपर्‍यात उभे राहून पावत्या फाडण्यात व्यस्त असतात.

त्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. वाहतूक पोलीस आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहन चालकांना दंड करण्याचा धडाका लावला आहे. किरकोळ कारणावरून फोटो घेऊन दंड केला जात आहे.

यावरून वाहतूक पोलिसांबद्दल मोठा असंतोष वाहनचालकांमध्ये निर्माण झाला आहे. वाहतूक सुरळीत सुरू राहील, याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच वाहन चालक यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24