अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- आदर्श गाव हिवरे बाजार मधील परिवर्तन आर्थिक समृद्धीपेक्षाही वैचारिक समृद्धीने आले आहे असे मत,अहमदनगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल ढूमे यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत काढले.
मा.पोपटराव पवार यांनी लोकसहभाग व शासकीय योजनांच्या आधारे गावात झालेल्या संपूर्ण कामांची माहिती दिली. त्यावेळी बोलताना श्री.ढूमे पुढे म्हणाले हिवरे बाजार गावाविषयी जे ऐकले होते त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळेपण अनुभवयास मिळाले.
अनेक गावात आर्थिक समृद्धी आली परंतु तेथे गुन्हेगारीही वाढली म्हणून वैचारिक समृद्धी हवी असेल तर पेनाची(शैक्षणिक ताकद) वाढली पाहिजे तर बंदुकीची गरज संपेल.
हिवरे बाजार येथील जलसंधारण,पाण्याचे नियोजन व दुग्ध व्यवसायातील भरारी, पिकांचे नियोजन तसेच श्रमशक्तीची ताकद या जोरावरच या गावात वैचारिक समृद्धी आली आहे त्यातूनच आर्थिक समृद्धी आली.
या गावातील बदल आधुनिक काळातील भगीरथ प्रयत्न आहे.उद्याचा सक्षम भारत घडवायचा असेलतर हिवरे बाजार सारखी आर्थिक समृद्धी बरोबरच वैचारिक समृद्धीची गरज आहे.