अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : ट्रक – दुचाकीचा अपघात ! दुचाकी फरफटत गेली, एक ठार तर एक जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच असून आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली आहे.

या अपघटमध्ये एक जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातात या ट्रकने दुचाकीला काही अंतर फरपटत नेले. ही घटना नेवासा बुद्रुक शिवारात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

या अपघातात कैलास उल्हास अमोलिक (रा. खोकर, ता.श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला. किशोर आहेर (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) हे यामध्ये जखमी झाले आहेत. किशोर आहेर यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी : किशोर आहेर व कैलास उल्हास अमोलिक हे दोघे जण वडाळा बहिरोबा येथे त्यांच्या मित्राचे लग्न असल्याने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास खोकर येथून नेवासा मार्गे निघाले होते.

साडेअकराच्या सुमारास नेवासा बुद्रुकजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी ट्रक खाली आली. मात्र ट्रक चालकाने वेग कमी न करता ट्रक पळविला.

त्यामुळे दुचाकी वाहनासोबत दुचाकी चालक किशोर आहेर फरपटत गेले. तसेच कैलास अमोलीक यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने ते जागीच मयत झाले.

जखमी किशोर आहेर यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी किशोर आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक अप्पासाहेब लक्ष्मण साबळे विरोधात गुन्हा दाखल केलाय.

Ahmednagarlive24 Office