अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. आता याच मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सवाल उपस्थित करत या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. एखाद्या भक्तांच्या कपड्यावरून त्या व्यक्तीला तुम्ही ती व्यक्ती कशी आहे हे ठरू शकत नाही.
शिर्डी संस्थाने घेतलेल्या निर्णय म्हणजे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अवमान आहे, अशी टीका देसाई यांनी केली आहे. दरम्यान, या निर्णयाचा निषेध करत देसाई पुढे म्हणाल्या की, शिर्डी येथील मंदिरातील अनेक पुजारी हे अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यामुळे कुठल्याही भक्ताने असे म्हटले नाही की पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका.
त्यामुळे शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे भक्तांचा अपमान करणार आहे. शिर्डी संस्थांने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. आणि शिर्डी मध्ये जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असे देसाई म्हणाल्या.
शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे.
अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे. देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मंदिर परिसरात संस्थानने असे सूचनाफलक लावले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved