गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी शहरातील पालिकेने नाविन्यपूर्ण योजनेतून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत.

कॅमेरे व शहरातील बंद पडलेले रस्त्यावरील पथदिवे सुरू करावेत, यासाठी मनसेच्या वतीने नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मंगळवारी घेराव घालत आंदोलन करण्यात आले.

दोन दिवसांत कॅमेरे सुरू करून पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. शहरात महिला व मुलींची छेडछाड, पाकीटमारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, शहरात व उपनगरी भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

कॅमेरे बंद असल्यामुळे चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना ओळखणे पोलिसांनादेखील अशक्य झाले आहे. शहरातील नागरिक, महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच बरोबर शहरातील गुंडगिरी, मारामारी, बसस्थानकावरील नित्यनियमाने होत असलेली पाकीटमारी,

या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी महत्वाचे असणारे व नगरपरिषदेच्या वतीने मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेले शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे महिनाभरात बंद पडले.

नागरी समस्या तातडीने सोडविण्यात याव्या अन्यथा आपल्या कार्यालयात सर्व नागरिकांसह मोठे आंदोलन करण्यात येईल व शहरात यापुढे घडणाऱ्या चोरी-लुटमार व छेडछाडीस मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24