अहमदनगर जिल्ह्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News  : पाथर्डी तालुक्यातील करंजी – भोसे रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, जोहारवाडी येथील पै. देविदास माणिक सावंत (वय ५५), हे करंजीहून भोसे मार्गे जोहारवाडीला जात असताना समोरून आलेल्या मोटारसायकलस्वराने सावंत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये देविदास सावंत यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

भोसे करंजी रोडवर गेल्या काही दिवसांपासून तरुण भरधाव मोटारसायकल चालवत आहेत. एकाच मोटारसायकलवर तीन-तीन तरुण प्रवास करत आहेत. कर्ण कर्कश आवाज व अति वेगामुळे शेतकऱ्यांना या तरुणांचा मोठा त्रास सहन करावा लागत असून,

अशीच काहीशी घटना सोमवारी सायंकाळी घडली आणि या अपघातामध्ये एका गरीब शेतमजूर व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सावंत यांच्या अपघाती मृत्यूमुळे जोहारवाडी, खांडगाव दगडवाडी, वैजूबाभळगाव, भोसे करंजी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सावंत यांच्या मोटारसायकलला धडक दिलेले तरुण करंजी येथील असल्याचे समजले असून, अपघातात दोन्ही मोटारसायकलींचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

सावंत यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.