अहमदनगर बातम्या

नदीत वाहून जाणाऱ्या दोन भावांना साडीच्या आधाराने वाचविले, ताईबाईंच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक !

Published by
Ahmednagarlive24 Office

गोदावरी नदीच्या पाण्यात तीन सख्खे भाऊ वाहून जाताना काठावर जवळच शेळ्या चारणाऱ्या ताईबाई यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने तिसऱ्या भावाला वाचविण्यात अपयश आल्याची हुरहुर त्यांना कायम आहे.

ताराबाई यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाशिक दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधारेने धरण ८० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातून हळूहळू हळूहळू ११ हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला होता.

त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहती झाली. परिणामी, नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. यात कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे सख्खे भावंडे नदीतील मोटारी काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले.

मात्र पाण्याचा जोर जास्त असल्याने तिघे भाऊ पाण्यात वाहून जातांना बुडत असल्याचे शेजारीच शेळ्या चारणाऱ्या मंजूर गावातील ताईबाई छबूराव पवार आणि पती छबूराव बाबूराव पवार यांनी ही घटना पाहिली.

तेव्हा क्षणाचाही विचार न करता शेळ्या चारणाऱ्या ताईबाई पवार यांनी प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि त्या साडीला धरून प्रदीप आणि अमोल दोन भाऊ पाण्यातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचवले. मात्र दुर्दैवाने संतोषला वाचविण्यात ताईबाई यांना अपयश आले. ताईबाईच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संतोष याला वाचविण्यात अपयश आल्याची तीव्र वेदना ताईबाई यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याला वाचवता न आल्याची हुरहूर मात्र नेहमी जाणवत राहील. इतर दोघांप्रमाणे स्व. संतोषलाही वाचविण्यासाठी यश यायला हवे होते, असे ताईबाई पवार यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office