Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील निघुटमळ्यामधे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी ही वडझिरे येथे घडली.
वडझिरे येथील महिला शेतकरी संजया बाबूराव निघूट यांच्या गट नंबर ३०९ मधील राहत्या घराजवळच्या गोठ्यामध्ये ५ शेळ्या बांधलेल्या होत्या. रात्री बिबट्याने गोठ्याच्या भिंतीवरून उडी मारुन दोन शेळ्यांवर हल्ला केला, यामध्ये दोन्ही शेळ्या जागीच ठार झाल्या.
शेळ्या ओरडण्याचा आवाज संजया निघूट यांची मुले घराबाहेर आली, या वेळी बिबट्य एका शेळीला गोठ्याबाहेर घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले, आरडाओरडा केल्यावर बिबट्या पळून गेला. मात्र, तो एक शेळी घेऊन गेला. घटना समजताच पारनेर वनविभागाचे वनरक्षक उमेश खराडे यांनी दोन पंचासमक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महिला शेतकरी संजया निघूट यांनी केली आहे. वनविभागाने वडझिरे परिसरात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वडझिरे ग्रामस्थांनी केली आहे. शेजारील पाडळी दर्या गावांमध्येही बिबट्याचा संचार असून, रात्री बेरात्री घराबाहेर पडायला ग्रामस्थ घबरत आहेत. बिबट्या मनुष्यावर हल्ला करू शकतो, त्यामुळे या बिबटयाचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.