Ahmednagar News : आयसीआयसीआय बँकेच्या नावाने आलेल्या एका फोनमुळे तब्बल दोन लाखांना चुना लागल्याची घटना नगर मधील एका व्यक्तीसोबत घडली आहे. संदीप याकोब साळवे असे या घटनेत फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आलोक सिंगला (नाव, पत्ता नाही) याच्याविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कलमानुसार गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी संदीप साळवे हे महावितरणमध्ये नाशिक येथे नोकरीला आहेत. मात्र त्यांचे कुटुंब नगर शहरातील कायनेटीक चौक परिसरात राहते. त्यामुळे ते शनिवार व रविवारी नगरमध्ये येत असतात.
गेल्या शनिवारी (२० जुलै) दुपारी ते नगरमधील घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवर एक अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणार्या व्यक्तीने फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेमधून आलोक सिंगला बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या क्रेडीट कार्डचा ‘सीपीपी’ काढून टाकायचा आहे.
त्यासाठी बँकेचे अॅप डाऊनलोड करा असे सांगितले. फिर्यादी साळवे यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आयसीआयसीआय बँकेचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले.
साळवे यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन आयसीआयसीआय बँकेचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी अॅटोरीड झाला व काही वेळातच त्यांच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख एक हजार ६५२ रूपये कट झाल्याचा मेसेज आला. काही वेळानंतर पुन्हा एक लाख एक हजार ६५२ रूपये कट झाल्याचा मेसेज आला.
साळवे यांनी त्या व्यक्तीला क्रेडीट कार्डवरून पैसे कट झाल्याचे सांगितले असता त्याने तुमचे पैसे २४ तासात कार्डवर पुन्हा जमा होतील, असे सांगितले. दरम्यान, साळवे यांना पैसे न आल्याने त्यांना आपली अज्ञात भामट्याने फसवणूक केल्याचे लक्ष्यात आले.
त्यानंतर त्यांनी सुरूवातीला ऑनलॉईन तक्रार दाखल केली व नंतर मंगळवारी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे अधिक तपास करत आहेत.