अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच अकोले तालुक्यातील लाहित शिवारात दोन बिबट्यांची झुंज झाली व या झुंजीत दोनही बिबट्यांच्या मृत्यू झाला आहे. याबाबत अकोले वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की,
लाहित शिवारातील एका उसाच्या शेतात रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक आठ महिन्याची मादी व एक सव्वा वर्षाचा नर बिबट्या यांच्यात झुंज सुरु होती.
यावेळी त्यांचा आवाज ऐकून शेजारी जागे झाले. मात्र समोर जाण्याचे कोणीही धाडस केले नाही. सोमवारी सकाळी या लोकांनी पाहिले असता दोनही बिबटे मृत्यू झाल्याचे आढळून आले.
लोकांनी सदर घटना ही अकोले वनविभागास कळविली. या घटनेची माहिती समजातच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.
या दोन्ही बिबट्यांचा पंचनामा केला असून या दोनही बिबट्यांचे शवविचेदन करण्यात आले. बिबट्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत.