Ahmednagar News : नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
तेलीखुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) यापूर्वी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले होते.
दरम्यान गुरूवारी दुपारी फिर्यादी व मुलगी घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक पूनम श्रीवास्तव तपास करीत आहेत.
केडगाव उपनगरात राहणाऱ्या व्यक्तीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीचे (वय १३) त्यांनी गुरूवारी सकाळी एका शाळेत अॅडमिशन केले व तिला घरी सोडले.
फिर्यादी कामावर निघून गेल्यावर मुलगी केडगाव परिसरात राहणाऱ्या आजीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती आजीकडे गेलीच नसल्याचे समोर आले आहे. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस मुलीचा शोध घेत आहेत.