MIDC In Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन नवीन एमआयडीसी मंजूर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MIDC In Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, अहमदनगर येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसी अशी ५०० एकरावर दुसरी एमआयडीसींना तत्त्वतः मंजुरी दिल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.

मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल, पशूसर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि.५) सह्यादी अतिथीगृह येथे संपन्न झाली.

या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना खा. विखे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून नव रोजगार निर्मितीच्या दृष्टिने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी, बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, तसेच स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने आज मुंबईत बैठक संपन्न झाली. बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता, अहमदनगर येथे ६०० एकर जमीन फेज २ साठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असून शिर्डी येथील शेती महामंडळाच्या ५०० एकर जमिनीवर दुसरी एमआयडीसीस तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले.

राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली जाणार नाही. या जमिनीचे आगाऊ हस्तांतरण महसूल विभागाकडून करण्यात येणार असून यामुळे एमआयडीसीचे ले आऊट आणि निर्माण कार्य होण्यास मदत होईल.

त्यामुळे हा भाग डी झोन म्हणून ग्राह्य धरण्यात यावा अशी विनंती त्यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यात हस्तांतरची प्रक्रिया पूर्ण होईल. दोन एमआयडीसीमुळे नगर जिल्ह्याचा विकास अत्यंत वेगाने होऊन नगर जिल्ह्यास वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.

महसूल विभागाने शासनाच्या जमिनी एमआयडीसीकरिता देण्यास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशूसर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर जिल्ह्याच्या विकासाकरिता दोन एमआयडीसी दिल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार खा. विखे यांनी व्यक्त केले.

जुन्या एमआयडीसीच्या संदर्भात न्यायलीन प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता एका वरिष्ठ वकिलाची नेमणूक करावी अशी विनंती मंत्री सामंत यांना केली असल्याचे त्यांनी सांगून उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत होईल.

निंबळक येथील एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून सूपा एमआयडीसीसाठी ५० कोटींचे अद्यावत असे अग्नीशमन स्टेशन, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, विस्तारित एमआयडीसीस तत्त्वतः मान्यता दिल्याने येत्या दोन वर्षांत अहमदनगर जिल्ह्यातील १५ हजार तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.