अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटमार करणारा जावेद घड्याळ्या चव्हाण (रा.सुरेगाव), बाबूश्या चिंगळ्या काळे (रा.वांगदरी) या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
हे दोघे दरोडेखोर पकडल्यामुळे आता तालुक्यातील अनेक गुन्हे उलगडण्यास मदत होणार आहे. दि. २०ऑगस्ट रोजी जावेद व त्याच्या साथीदारांनी जळगाव जिल्ह्यातील महिला व पुरुषांना विसापूर फाटा येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेत, त्यांच्याकडील ३ लाख १५हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
त्याबाबत बेलवंडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दरम्यान विसापूर फाट्यावर जावेदच्या चार साथीदारांचा खून झाला होत. तेव्हापासून तो फरार झाला होता.
श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना जावेद हा सुरेगाव परिसरात असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार ढिकले यांनी सदर भागात पाठवलेल्या पथकाने त्या परिसरातून जावेद घड्याळ्या चव्हाण व बबूश्या चिंगळ्या काळे या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पॅशनप्रो दुचाकी जप्त केली.
ती त्यांनी पुणे जिल्ह्यातील यवत येथून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. हे दोन्ही आरोपी अट्टल दरोडेखोर असून यांच्याविरोधात श्रीगोंदा, पारनेर, सुपा, नारायणगाव, लोणीकाळभोर, यवत या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे नोंद आहेत.