Ahmednagar News : कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर परिसरात गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी तुषार महाले यांच्या भावास आरोपी दत्तु साबळे, राहुल शिदोरे, चेतन शिरसाठ, सिध्दार्थ जगताप यांनी मारहाण केली होती, म्हणून आरोपीस फिर्यादीने तुम्ही माझ्या भावाला का मारले याबाबत विचारले म्हणून
रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी हातात कोयते व बंदुक घेऊन डॉ. झिया हॉस्पिटल व अमोल मेडिकलच्या समोर रोडवर येऊन फिर्यादीस लाथा- बुक्क्यांनी मारहाण करुन गावठी कट्यातून गोळी झाडली व फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
इतर आरोपींनी फिर्यादीवर कोयते उगारुन तु जर पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुझी गेम करु, अशी धमकी दिली व तेथून पसार झाले. या प्रकरणात फिर्यादी तुषार महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राहुल शिवाजी शिदोरे (रा. गोकुळनगरी, कोपरगाव),
दत्तु शांताराम साबळे (रा. निवारा कॉर्नर, कोपरगाव), चेतन सुनिल शिरसाठ (रा. टाकळीनाका, कोपरगाव), सिद्धार्थ प्रकाश जगताप (रा. टाकळीनाका, कोपरगाव) व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याकरीता पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस शिपाई गणेश काकडे, राम खारतोडे, संभाजी शिंदे, पोलीस हवालदार बाबासाहेब कोरेकर, पोलीस शिपाई यमनाजी सुंबे, महेश फड यांच्या पथकाने नाशिक, अहमदनगर व इतरत्र जाऊन आरोपीचा शोध घेतला; परंतु आरोपी हे मिळून आले नव्हते.
दरम्यान दि. १४ डिसेंबर रोजी रात्री वरील आरोपींपैकी चेतन सुनिल शिरसाठ, सिद्धार्थ प्रकाश जगताप हे सिन्नर येथे एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर येथे जाऊन हॉटेलमधुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख, उपनिरिक्षक रोहीदास ठोंबरे,
शिपाई गणेश काकडे, राम खारतोडे, यमनाजी सुंबे, महेश फड यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रोहीदास ठोंबरे करीत आहेत.