अहमदनगर मध्ये अपघातात दोन जणांचा मृत्यू ! नगर-जामखेड रस्ता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर तालुक्यात शुक्रवारी व रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. सारोळाबद्दी व अरणगाव परिसरात हे अपघात झाले आहेत.

नगर-जामखेड रस्त्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांना कंटेनरने धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला. नानाभाऊ एकनाथ पवार (वय ४५ रा.जि. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

विजय बबन वडलिक (वय ३८ रा. ता. आष्टी, जि.बीड) हे जखमी झाले. सारोळाबद्दी (ता. नगर) शिवारात शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी जखमी विजय वडलिक यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंमलदार एस. व्ही. खरात करीत आहेत.

नगर तालुक्यातील अरणगाव चौक येथे रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात संजय अर्जुन शिंदे (वय ३८, रा. शिंदेवस्ती, निंबळक बायपास चौक, ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे.

संजय शिंदे यांचा अरणगाव चौकात रविवारी सायंकाळी अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक गणेश शिवाजी साळवे (रा. हिवरेझरे ता. नगर) यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान, तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास महिला अंमलदार के. एस. हरिश्चंद्रे करीत आहेत.