Ahmednagar News : नगर तालुका हद्दीतील गंभीर दुखापत व जबरी चोरी करणारी गुन्हेगारांची टोळी दीड वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही कारवाई केली आहे. टोळीविरोधात नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), टोळी सदस्य किरण बापु घायमुक्ते (वय ३१, दोघे रा. देऊळगाव सिध्दी, ता. नगर) व अमोल शहाजी गायकवाड (वय २६ रा. वडगाव तांदळी, ता. नगर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.
दीपक घायमुक्ते याने टोळी करून संघटीतपणे २०२१ पासून २०२३ पर्यंत नगर ग्रामीण भागात गंभीर दुखापत व जबरी चोरीचे नऊ गुन्हे केले आहेत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
टोळीचे गैरकृत्य थांबवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली होती. परंतू, त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. सदर टोळीला नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव नगर तालुका पोलिसांनी तयार करून पोलीस उपअधीक्षक संपत भोसले ( नगर ग्रामीण) यांच्याकडे चौकशीसाठी पाठविला होता.
उपअधीक्षक भोसले यांनी चौकशी करून अहवाल अधीक्षक ओला यांच्याकडे सादर केला. अधीक्षक ओला यांनी सखोल चौकशी करून घायमुक्ते टोळीला दीड वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.