Ahmednagar News : श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या उरूसानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल गुरूवारी (दि. २) रात्री पावने दहाच्या सुमारास दगडफेक झाली.
यात दोन पोलीस किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उरूसानिमित्त काल गुरूवारी रात्री शहरातील नॉर्दन ब्रँच येथून दोन मिरवणुका निघाल्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी चौकात आल्या. तेथे १५ ते २० मिनिटे थांबल्याने मिरवणूक पुढे घेण्याच्या कारणाहून पोलीस आणि मिरवणूकीमधील तरुणांमध्ये वाद झाले. यावेळी पोलिसांवर काहींनी रेल्वे रुळावरून दगडफेक केली.
यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यात एक स्थानिक पोलीस कर्मचारी तर शिघ्र कृती दलाच्या (आरसीपी) जवानाचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी बंदोबस्त वाढवला. पुढील काही वेळात मिरवणूक संपल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.