अहमदनगर बातम्या

संदिप मिटके गोळीबार प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, आरोपीला १३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे एका घरात दिनांक ७ ऑक्टोबर रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली असता या घटनेत तरूणीसह विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके व एक पोलिस शिपाई हे तिघे बालंबाल बचावले.

याप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजीच वरात्री उशिरा घटनेतील तरुणी व डिवायएसपी संदिप मिटके यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर वेगवेगळे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी लोखंडे यास १३ ऑक्टोबर पर्यन्त न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, डिग्रस येथील महिलेने सुनील लक्ष्मण लोखंडे राहणार वानवडी. पुणे याच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. याचा राग मनात धरून दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी हा महिलेच्या घरात घूसला.आणि मुलांना पिस्टल लावले.

धाक दाखविण्यासाठी घरातील स्वयंपाक घराच्या दिशेने फायर केला. सदर घटनेच्या अनुषंगाने सदर कुटुंबीयांना सोडविण्यासाठी विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके हे त्या ठिकाणी गेले. तेव्हा आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे याने शासकीय कामात अडथळा आणून संदिप मिटके यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी झटापट करून त्यांना दुखापत केली.

तसेच त्यांच्यावर पिस्टलमधून गोळीबार केला. दुसरी फिर्याद १९ वर्षीय तरूणीने दिली आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे कि, वडील आई व भाऊ असे तघरात असताना सुनिल लोखंडे हा घरात अनधिकृतपणे गुन्हा करण्याच्या उद्देशाने घूसला. आईने आरोपी सुनील विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात ठेवून व दाखल गुन्हा मागे घ्यावा.

या उद्देशाने गावठी कट्टासह घरात प्रवेश करून फिर्यादीला गावठी कट्टा लावून डांबून ठेवले. तसेच दहशत निर्माण करून गावठी कट्ट्यातून गोळी फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आज आरोपी सुनिल लक्ष्मण लोखंडे याला राहुरी येथील महिला न्यायाधीश सौ. सुरेखा शिंदे यांच्या समोर हजर केले असता त्याला १३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Ahmednagarlive24 Office