अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात लिगाडेवस्ती नजीक औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या सियाज कारने (क्र. एम.एच १४ जी.ए.७७०५) बजाज डिस्कव्हर
(क्र. एम.एच. १६ ए.यू.१९७४) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार पांडुरंग भानुदास कराळे (वय ५० रा. घोडेगाव, ता.नेवासा) हा जागीच ठार झाला आहे.
कार भरधाव वेगात असल्याने अपघातानंतर गाडीने दोन पलट्या खाल्ल्या. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्तांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पोलीस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. लिगाडे वस्तीजवळ इमामपूर शिवरस्त्याचा चौक असल्याने येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असतात. या परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहे.