Akole News : शेंडी येथून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने बुलेट गाडी चोरून नेल्याने भंडारदरा परिसरात दुचाकी चोरांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाल्याचे लक्षात येत आहे.
गुरुवारी मध्यरात्री १ वाजुन १० मिनिटांनी शेंडी येथील बसथांब्यावर असणाऱ्या हॉटेल डॅमव्ह्यु समाधानजवळून अमित पवार या युवकाची अंदाजे दीड लाख रुपये किंमतीची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे.
गाडीची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून अवघ्या दीड ते दोन मिनिटांत अंगात पांढरा शर्ट व अंगकाठीने सडपातळ असणाऱ्याने व्यक्तीने गाडी चोरल्याचे दिसत आहे. राजूर येथूनही त्याच दिवशी एक बुलेट गाडी चोरीला गेल्याची माहिती समजते आहे.
घटना घडण्याच्या दोनतीन दिवस अगोदर एका भागडे नावाच्या शिक्षकाच्या गाडीची चोरी झाली आहे. सलग आठ दिवसात दोन गाड्या चोरीच्या घटना घडल्यामुळे भंडारदरा परिसरात दुचाकी गाड्यांच्या चोरीचे सत्र सुरु झाले असून गाडी चोरीचे गुन्हे राजुर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले आहेत.
चोरीचा तपास राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिलीप डगळे, अशोक काळे, सचिन शिंदे व लांडगे करत आहेत. गाडी शेंडीमध्ये दोन ते तीन ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असुन ती वारंघुशी फाट्याच्या दिशेने गेली असल्याचे दिसत आहे.