अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भक्ष्याच्या शोधात असलेला तीन वर्षाचा बिबट्या लक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला. अन अलगद पिंजऱ्यात कैद झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली.(leopard news)
नर जातीचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना रात्रीच्या सुमारास पावसे यांच्या बिनकठड्याच्या विहिरीमध्ये पडला. विहिरीला कठडे नसल्याने बिबट्या विहिरीत पडल्याची बाब सकाळी पावसे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला ही माहिती दिली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला विहिरीतून वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बराच वेळ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.
अखेर या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीतून वर काढण्यात वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले. परिसरातील शेतकरी आणि युवकांनी त्यांना यासाठी मदत केली.