अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर आज अनंत चतुर्थ दिवशी लाडक्या गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात आला. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांची उत्सुकता वाढवणारी आणि डोळ्यांची पारणे फेडणारी असते.
मात्र, यंदा कोरोनाच्या धर्तीवर या सोहळ्यावर अनेक मर्यादा असून विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे ना ढोल ताशांचा गजर… ना डीजेचा थरार अशी यंदाच्या गणेश विसर्जनाची अवस्था आहे. गणेशभक्तांच्या आनंदात विरजण पडले असून ढोल ताशा पथक व इतर वाद्य वृंद चालकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.
यामुळे वाद्यवृंद चालकांचे 60 लाखांचे नुकसान कोरोना महामारीमुळे झाले आहे. लॉकडाऊनचा थेट फटका संगमनेर तालुक्यातील वाद्यकलाकारांना बसला आहे. कुठलेही कार्यक्रम होत नसल्याने तालुक्यातील 60 ते 70 बँड बँजो पथकातील सुमारे 500 कर्मचार्यांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.
गणेशोत्सवात दोन्ही मिरवणुकांना परवानगी नसल्याने उत्सव या कलाकारांच्या हातून गेला आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील वाद्य कलाकारांची अनेक पथके आहेत. मात्र करोनाच्या संकटामुळे या पथकातील कलाकारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रत्येक वाद्यपथकात 10 ते 15 जण काम करतात मात्र त्यांच्या हाताला कामच राहिले नाही.
गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे गणेश भक्तांसाठी प्रचंड उत्साह असतो या मिरवणुकीची जय्यत तयारी सर्वच गणेश मंडळे करतात. मिरवणूक अधिक आकर्षित व्हावी यासाठी ढोल-ताशांच्या पथकांना खास आमंत्रित करण्यात येते. ढोल ताशा पथक पूर्वी पेक्षा खूप बदलले आहे. अधिकाधिक आकर्षित होत आहे.
पूर्वी अनेक गणेश मंडळांचे स्वतःचे ढोल ताशा पथक असायचे कालांतराने यात बदल होऊन आता बाहेरून या पथकांना आमंत्रित करण्यात येते. मंडळाची गरज ओळखून या पथकांनी अनेक बदल केले आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ येथील ढोल-ताशा पथकांना मिरवणुकीसाठी खास मागणी असते.
मोठ्या रकमेची सुपारी घेऊन हे पथक चालक मिरवणूक अधिक रंगतदार होईल यासाठी प्रयत्न करतात. संगमनेर शहरातही अनेक मंडळांकडे स्वतःचेच ढोल ताशा पथक आहे. याशिवाय शहरातील मंडळांची गरज ओळखून काही उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पथकाची निर्मिती केली.
या पथकात एकाचवेळी 15 ते 20 ढोल-ताशांचा समावेश करण्यात येतो. शहरात अनेक छोटे-मोठे ढोल ताशा पथक बँडपथक अस्तित्वात असून 5 हजार ते 2 लाखांपर्यंत सुपारी घेऊन ते गणेश मंडळांना सेवा पुरवितात. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूकच होणार नसल्याने या ढोल ताशा पथकांची तयारी वाया गेली आहे.
त्यांचे लाखो रुपयांंचे नुकसान होणार आहे. जगभरात थैमान घालणारा करोना महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणावर पसरत आहे याचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. गणेशोत्सवात होणारी गर्दी व त्यातून मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे.
यामुळे सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यासाठी गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी आणण्यात आली यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणूक निघणार नाही.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved