अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. यात आरोग्य,पोलिस व त्यांच्या सोबतच जिल्हा परिषदेचे शिक्षक वर्ग देखील खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
परंतू शिक्षण व महसूल यांचा समन्वय नसल्यामुळे प्राथमिक शिक्षकांची प्रचंड कुचंबना होत आहे. लसीकरण न करता कोविड ड्युटी केल्यामुळे कोरोनाची बाधा होवून जिल्ह्यातील जवळपास ४२ शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व दोषी असणाऱ्यांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक परिषेदेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केली आहे. राज्यात जवळजवळ सर्वच जिल्हा परिषदांमधील शिक्षकांचे यापूर्वीच लसीकरण झालेले आहे.
मात्र जिल्ह्यातील शिक्षक अद्यापही लसीकरणापासून वंचित आहेत. शासनाचे कोणतेही काम प्राथमिक शिक्षकांशिवाय पूर्ण होत नाही. परंतु त्यांच्या आरोग्याबाबत कोणीही लक्ष देत नाही. लसीकरणाबाबत आम्ही सातत्याने मागणी केली परंतू लसीकरणासाठी आदेश काढायला अधिकारी वर्गाला वेळ मिळत नाही.
सर्व राज्यात लसीकरण झालेले असताना नगर जिल्हा अपवाद कसा राहीला. याची चौकशी करून त्याशिक्षकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.
अशी मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज प्रत्येक शिक्षक आपल्या कुटुंबासमवेत घरी थांबून आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तहसील कार्यालयापुढे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.