अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. तर काही ठिकाणी गावकऱ्यांमध्ये एकी होत नसल्याने निवडणूक होणारच आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यातच जिल्ह्यातील अकोले मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अकोले तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी मोग्रस, शेरणखेल, उंचखडक खुर्द, म्हाळादेवी, मनोहरपूर, वाघापूर, निंब्रळ, चितळवेढे, निळवंडे, कळंब व बहिरवाडी या ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होतील. अनेक ग्रामपंचायतींत केवळ एक व दोन प्रभागांत मतदान होणार असून उर्वरित प्रभाग बिनविरोध झाले आहेत.
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना २६ लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. गाव पुढारी विरुद्ध सामान्य जनता असा सामना गावोगाव रंगणार आहे.
आजी-माजी आमदार किती मोर्चेबांधणी करतात, यावर पुढची गणिते अवलंबून आहेत. बिनविरोधपेक्षा सरळ लढत देऊन प्रस्थापितांविरुद्ध मतदारांनी दंड ठोकले आहेत. तहसील कार्यालयात गर्दीमुळे मास्क व सामाजिक डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.