अर्बन बँक 150 कोटींची फसवणूक; पोलिसांना आरोपीने दिली महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :नगर अर्बन बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड तपास करत आहेत.

या प्रकरणातील आरोपी सचिन गायकवाड (रा. कौडगाव ता. श्रीगोंदा) सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस कसून तपासणी करत आहे. तो बोलता झाल्याने फसवणूक प्रकरणातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती येत आहे.


दरम्यान गायकवाडकडे सुरू असलेल्या तपासादरम्यान कर्जाच्या रकमेतील व्यवहारांच्या महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत. संचालकांशी संबंधित जवळच्या व्यक्तींची कर्ज प्रकरणे मिटवण्यासाठी अथवा एनपीएतून बाहेर काढण्यासाठी गायकवाडच्या नावे घेतलेल्या कर्जप्रकरणाच्या रकमा संबंधित कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी आरोपी गायकवाड त्याच्याशी संबंधित घृष्णेश्‍वर मिल्क व जिजाऊ मिल्क प्रॉडक्शन या कंपन्यांच्या कर्जखात्याची व बँक खात्याची तपासणी सुरू केली आहे. कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग इतर कारणासाठी झाल्याचे यात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळचे काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट संदर्भातही पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातही काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे बँकेतील व्यवहारांमधून समोर येत असल्याने या रकमा कुणाकडे वळविल्या गेल्या, या सर्व प्रकारांमध्ये कोणाची साथ होती, यात संचालक व अधिकार्‍यांचा समावेश आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

20 जूनपर्यंत आरोपी गायकवाड यांना पोलीस कोठडी असल्यामुळे तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची दाट शक्यता आहे. तपासात आरोपी गायकवाडकडून मिळालेल्या माहितीनुसार व बँकेच्या अहवालामधील व्यवहारांच्या नोंदीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला आहे.

दरम्यान पोलिसांनी नगर अर्बन बँकेकडे काही माहिती मागितली होती. त्यांना ती माहिती न मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने थेट आरबीआयकडून बँकेशी संबंधित सर्व अहवाल प्राप्त करून घेतल्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा संपूर्ण लेखाजोगा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन संचालकांचे धाबे दणाणले आहेत.