मंगळवारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत श्रीरामपूर येथे नगर रचनाचे नामकरण सहाय्यक संचालक नगर रचना शाखा असे नामकरण मंजूर करण्यात आले असून या कार्यालया अंतर्गत श्रीरामपूर सह संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा, अकोले हे तालुके येणार आहे.
नगर पालिका हद्दीतील बांधकासंदर्भातील सर्व सिटी सव्र्व्हेतील कामे आता श्रीरामपुरात होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस- अजितदादा या महायुती सरकारच्या निर्णयामुळे श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या मार्गाला भरीव बळ मिळाले असल्याचे मानले जाते.
आता श्रीरामपूरसह संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, नेवासा व अकोले हे तालुके सहाय्यक संचालक नगररचना कार्यालयास जोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. आता यापुढे या सर्व तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती तसेच महसूल विभागाकडील नगररचना विषयक जी कामे आहेत ती याच कार्यालयाकडून करता येणार असून यास नगर विकास विभागाने देखील मान्यता दिली आहे.
गेल्या १०-१५ वर्षापासून या कार्यालयासाठी प्रयत्न सुरु होते. या कार्यालयासाठी आमदार लहु कानडे यांनी लक्षवेधी देखील मांडलेली होती. आता या कार्यालयाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी तसेच येथे नवीन पदांना मंजुरी देण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे उत्तर नगर जिल्ह्याच्या भागातील नागरिकांची घरांच्या बांधकाम परवानगी व बिगर शेतीच्या कामांसाठी नगर येथे जाण्याची गरज संपली असून त्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके असून जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. नगररचना विभागाचे जिल्हास्तरीय कार्यालय केवळ नगर येथे मुख्यालयी कार्यरत असल्याने उत्तरेतील सात तालुक्यांच्या नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत होती.
उत्तरेतील तालुक्यांतील नागरिकांना बांधकाम विषयक कामासाठी नगर येथे जावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याची ओरड पूर्वीपासून होती. आता या तालुक्यातील लोकांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे.
राज्य सरकारमध्ये महसूल मंत्री असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिमंडळात असताना या सरकारने श्रीरामपूरसाठी घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय असल्याने विखे पाटील यांचे श्रीरामपूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच श्रीरामपूरच्या व्यापारी वर्गाने अभिनंदन करत धन्यवाद दिले आहे.