अहमदनगर बातम्या

‘विरोधकांनी शरणागती पत्करावी म्हणून ईडीचा शस्त्र म्हणून वापर’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- विरोधकांना शरणागती पत्करण्यासाठी केंद्र सरकार ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेचा शस्त्र म्हणून वापरत आहे. २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात सुड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या.

शरणागती पत्करा किंवा भाजपमध्ये प्रवेश करा, या पध्दतीने ईडीच्या मदतीने राजकारण केले जात आहे. ईडीद्वारे कारवाया अनेक पण मोजक्यांना शिक्षा झाल्याची आकडेवारी मांडत ईडीने केलेल्या बहुतेक कारवाया संशायाच्या भोवर्‍यात असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

नगरमध्ये ईडीचे वादळ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. पुढे अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, कुणालाच भ्रष्टाचारी लोकांबद्दल सहानुभूती असण्याची गरज नाही, प्रत्येक भ्रष्टाचारी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे.

पण कायद्याची प्रक्रिया पाळून कारवाया व्हाव्यात, ही कायदेशीर अपेक्षा अनेक नागरिकांनी करावी. अशी स्पष्टता मनात व डोक्यात निर्माण होण्याची गरज आहे. ईडीच्या कारवाईने एखाद्या व्यक्तीचे राजकीय व सामाजिक जीवन उध्दवस्त करणे, त्या व्यक्तीविरोधात लोकांमध्ये संशय निर्माण करण्याचे काम होत आहे.

राजकीय कारणासाठी ईडीचा या केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याने लोकशाहीची प्रकृती बिघडणार आहे. ईडीचे यश-अपयश नागरिकांनी ओळखण्याची गरज असून, नागरिकांना यंत्रणेला जाब विचारण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मनी लॉन्ड्रिंग दाखवून ईडी स्वतःच्या हातात कारवाई घेते, तेव्हा त्यात बेकायदेशीरता असते असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

राजकीय कारणासाठी सत्ताधार्‍यांनी त्याचा विपर्यास करुन कायद्याचा संघटित गुन्हेगारी पद्धतीने वापर केला जात आहे. भाजप हा राजकीय कोंडवाडा बनला आहे.

मस्तवाल झालेल्या राजकीय आर्थिक भ्रष्टाचार केलेल्या पुढाऱ्यांच्या मागे ईडी लाऊन व त्यांना भाजप मध्ये घेऊन स्वच्छ करण्याचा प्रयोग भाजपसाठीच भविष्यात आत्मघातकी ठरण्याची शक्यता असल्याचेही अ‍ॅड. सरोदे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office