Ahmednagar News : श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी किशोर काळे यांना हजर करुन घेण्याच्या पणन मंत्रालयाच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालामुळे बाजार समितीच्या सचिवपदी साहेबराव वाबळे हेच कायम राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल व डिझेल उधारीवर देण्यात आले होते. काही रक्कम उधारीवर दिली. याबाबत सचिव काळे यांची चौकशी झाली होती. चौकशी अहवालात काळे यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले होते.
लेखा परीक्षणातही २९ लाख रुपयांचे पेट्रोल व डिझेल उधारीवर दिल्याचे ताशेरे ओढले होते. या कामी सचिव काळे यांना जबाबदार धरण्यात आले होते. चौकशी अहवालात सचिव काळे यांच्या सांगण्यावरुनच उधारीवर पेट्रोल व डिझेल दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे काळे यांना पदमुक्त करुन सचिवपदाचा पदभार साहेबराव वाबळे यांच्याकडे देण्यात आला होता. या विरोधात काळे यांनी उपविभागीय सहनिबंधक (नाशिक) यांच्याकडे अपील केले होते. त्याचा निकाल काळे यांच्या बाजुने लागला.
यावर बावळे यांनी पणन मंत्रालयात अपील दाखल केले. पणन मंत्रालयानेही काळे यांच्या बाजुने निकाल दिला. काळे सचिव पदाचा पदभार घेण्यास श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यालयात आले. यावेळी त्यांचा अर्ज दाखल करुन घेतला.
कारण त्यांना दाखल करुन घेण्याचे अधिकार सभापतींना होते. त्यावेळी राजकीय दबावाचा वापर करण्यात आला. सचिव पदाचा चार्ज घेण्यास डीडीआर व एआर यांना पाठविण्यात आले. त्यावेळी अर्जावर बैठकीत निर्णय घेवु, असे सांगण्यात आले. यामुळे काळे निघुन गेले, मात्र राजकीय दबावाचा वापर करुन साहेबराव वाबळे व ईतरावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर वाबळे यांनी पणन मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. याबाबतची सुनावणी न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्यासमोर झाली. यावेळी पणन मंत्रालयाने दिलेल्या आदेशास न्यायमूर्ती शैलैश ब्रम्हे यांनी स्थगिती देत काळे यांच्यावर चौकशी अहवालातील गंभीर दोष कायम ठेवले.
यामुळे वाबळे हेच बाजार समितीच्या सचिवपदी कायम राहणार, यावर शिक्कामोर्तब झाला. वाबळे यांच्या वतीने अॅड. राहुल कर्पे यांनी काम पाहिले त्यांना अॅड. योगेश शिंदे यांनी सहकार्य केले. सरकारी वकील एस. डी. घायळ यांनी काम पाहिले. काळेंच्या वतीने अॅड. ए. डी. शिंदे व अॅड. अश्विन होन यांनी काम पाहिले.