अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी सामान्यांना आज सोमवार (दि.1 मार्च) पासून खासगी हॉस्पिटलमध्ये नोंदणी करता येणार आहे.
ही नोंदणी झाल्यानंतर मान्यता दिलेल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांत येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी रविवारी जिल्हा रुग्णालयात लसीकरण मोहिमेत सहभागी होणार्या हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानुसार जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेत मान्यता आणि आयसीयू कक्षाची सुविधा असणार्या 32 खासगी आणि 4 शासकीय अशा 36 ठिकाणी लसीकरण होणार आहे.
यात खासगी ठिकाणी सशुल्क तर शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत करोना लस दिली जाणार आहे. दरम्यान, आधी सुरू असणारी आरोग्य कर्मचारी आणि फेें्रटलाईन कर्मचारी यांचे नियमित लसीकरण सूरू राहणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
सामान्य व्यक्ती असणार्या 60 वर्षापुढील आणि ४५ पेक्षा जास्त वय असणार्या आणि 20 आजार असणार्यांना खासगी ठिकाणी सशुल्क तर खासगी ठिकाणी मोफत करोना लस मिळणार आहे. खासगी ठिकाणी लसीचे 150 रुपये आणि 100 रुपये सेवा शुल्क असे 250 रुपये भरावे लागणार आहे.