पिण्याच्या पाण्यासाठी ‘वंचित’ने केले सामूहिक मुंडन आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- शेवगाव शहराला १२ दिवसानंतर पिण्याचे पाणी देणाऱ्या नगरपरिषद प्रशासन व सत्तेत असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निषेधार्थ वंचित बहुजन

आघाडीच्यावतीने प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव येथील बस स्टँड समोरील क्रांती चौकात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, शहराध्यक्ष विशाल इंगळे, संघटक शेख सलीम जिलानी, वंचित बहुजन आघाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, भाऊराव सरसे, कचरू मगर यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुंडन केले.

या आंदोलनात लखन घोडेराव, राजू शेख, प्रल्हाद कडमिंचे, विष्णू गायकवाड, अनिल कांबळे, रेश्मा गायकवाड, लक्ष्मण मोरे, रतन मगर, विश्वास हिवाळे  यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे, शेवगाव नागरिकांच्या वतीने प्रेम अंधारे यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.

शेवगाव शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण शहरापासून हाकेच्या अंतरावर असून शेवगावला ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा ३-४ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत होते.

परंतु नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून शेवगाव मधील नागरिकांना प्रत्येक महिन्यात १० ते १२ दिवसाला पिण्याचे पाणी मिळते. ते ही पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

त्यामुळे शेवगाव शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक महिला व भगिनींना पाण्यासाठी दूरवर रानोमाळ भटकंती करावी लागते. वर्षातून फक्त ३६ दिवस पाणी येते मात्र नगरपरिषद पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करते.

हा कुठला न्याय त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेने नागरिकांकडून वसूल केलेली पाणी पट्टीची ७५ टक्के रक्कम परत करावी व नवीन वर्षांपासून तरी पुरेशा प्रमाणात वेळेवर पाणी पुरवठा करावा. अशी मागणी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24