अहमदनगर बातम्या

भंडारदरा नगरीमध्ये वर्षा उत्सव सुरू, विकेंडचे औचित्य साधत भंडारदऱ्याला भरली पर्यटकांची जत्रा !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या निसर्गनगरीत पर्यटकांची जत्रा भरल्याचे शनिवारी व रविवारी दिसून आले. हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट दिली.

भंडारदरा नगरीमध्ये सध्या वर्षा उत्सव सुरू असून वरुण राजा भंडारदऱ्यावर मेहेरबान झालेला आहे. १ जुनपासून भंडारदऱ्याला मान्सून दाखल झाला आणि निसर्गाने कात टाकली. डोंगररांगांनी हिरवळरुपी शाल परिधान केली असून डोंगरांच्या काळ्याभोर कातळावरून असंख्य धबधबे कोसळत आहेत.

या धबधब्यांमध्ये धरतीचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा वसुंधरा फॉल पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. भंडारदराच्या रिंग रोडला निसर्गाचे अनेक असे पर्यटनस्थळे असून यामध्ये वसुंधरा फॉल, बाहुबली फॉल, तान्ही कॉल, नेकलेस फॉल, सांदनदारीचा रिव्हर्स धबधबा, घाटघरचे दोन्ही कोकणकडे, पांजरे येथील पांजरा फॉल, वैशाली धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

विकेंडचे औचित्य साधत भंडारऱ्याला शनिवारी व रविवारी पर्यटकांची जत्रा भरली होती. शनिवारी सकाळपासूनच भंडारदऱ्यात पर्यटकांचे जथ्थे दिसून येत होते. अनेक पर्यटकांनी भंडारदऱ्याच्या रिंग रोडला असणाऱ्या पर्यटनस्थळांना भेट देणे पसंत केले. धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

भंडारदरा म्हटलं की पावसाळ्याची आठवण होते. भंडारदऱ्याला पावसाळ्यात कांदा भजी खाण्याची चवच वेगळी असते. शेंडी गावामध्ये असणारी गुगल भजी, मिसळपाव, कांदा भजी यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅफे डॅम कॉर्नर, भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ मिळणारी कांदा भजी तसेच त्या परिसरात विकल्या जाणाऱ्या मक्याच्या दुकानात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

कोलटेंबे येथील नान्ही फॉलवर मनसोक्त भिजल्यानंतर त्या ठिकाणी भजी खाण्याचा पर्यटकांनी आनंद घेतला. त्यासोबतच वाफाळलेला गवती चहा पिणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरली. शनिवार व रविवार र्यटकांसाठी भंडारदऱ्यात रूम भेटणे मुश्किल झाले होते. साहजिकच भंडारदरा हाउसफुल्ल दिसून आला.

भंडारदऱ्याला धरणाच्या सांडव्याजवळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली तर या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राजुर पोलीस कसोशीने प्रयत्न करतानाही दिसून येत होते. एक प्रकारे भंडारदऱ्याला पर्यटकांची जत्राच भरलेली दिसून आली.

Ahmednagarlive24 Office