कोल्हार भागात गेल्या महिन्यापासून नुसतीच आभाळमाया दाटून येत असल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. रुसलेला वरुणराजा सोमवारी काही प्रमाणात बरसला. सायंकाळी सुरू झालेल्या रिमझिम भिज पावसाने मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळू शकते.
नगर जिल्ह्यात मृगनक्षत्राने साथ दिल्याने शेतकरी पेरणी करून मोकळा झाला, परंतु गेला एक महिना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. आता दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याने केलेला खर्च व परिश्रम मातीमध्येच मातीमोल होईल, याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.
भीज पाऊस झाला तर पिकांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा बाळगून असलेला शेतकरी आता पावसासाठी पांडुरंगाला साकडे घालत होता.
पाऊस रुसल्याने बळीराजाच्या कपाळावरील चिंता वाढत होत्या. त्यात प्रवरा परिसरात पाऊस नसल्याने शेतीमध्ये उगविलेली पिके आता मान टाकू लागली होती.
मोठ्या आशेने केलेली पेरणीही उगवतेय की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. जमिनीची मशागत, महागडे खते टाकूनही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यवसायिकही आभाळाकडे डोळे लावून बसला होता.
रिमझिम पावसावर पिके तक धरू शकतात; परंतु रिमझिम काय भिज पाऊसही होत नसल्याने भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पुणे, मुंबई सह अनेक शहरात रस्ते जलमय झाले.
परंतु सिमेंटच्या बिल्डिंगवर कोसळणाऱ्या पावसाने अखेर काल प्रवरा परिसरात हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या चेहेऱ्यावर थोडेसे हसू फुलले आहे. मात्र परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.