अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- शिर्डीत दरवर्षी नाताळाच्या सुट्टयात भाविकांची अलोट गर्दी साईबाबांच्या दर्शनासाठी होत असते.मात्र यंदा करोना संकटामुळे गर्दीवर मोठा परीणाम झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी कमी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिदिन बारा हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान करोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने नियम व अटी लागू करत साईदर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. भाविकांची सुरक्षितता तसेच सुलभ दर्शन व्हावे, यासाठी संस्थान व पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.
पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने सुरक्षा व वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे.
शिर्डीत नगर-मनमाड महामार्गावर लक्ष्मीनगर पाँईट ते रत्नारक बँक चौकापर्यंत नो व्हेईकल झोन जाहीर केला आहे. वाहतूक शाखेचे अधिकारी,
शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी भाविकांची सुरक्षा व वाहतुकीचे नियोजन करत आहे. साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले मात्र गर्दीत वाढ नसल्याने धंदे नसल्याने व्यावसायिक अडचणीत आहेत.
संस्थानने मंदिर खुले केले असले तरी चार नंबर व तीन नंबरचे प्रवेशद्वार बंद ठेवल्याने येथील व्यावसायकांचे नुकसान होत आहे. संस्थानने हे गेट खुले करावे,अशी मागणी केली जात आहे.