दक्षता जनजागृती सप्ताहास जिल्ह्यात प्रारंभ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसानिमित्त एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्हयात दिनांक २७ ऑक्टोबरपासून या सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह ०२ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून सतर्क भारत, समर्थ भारत ही या सप्ताहाची संकल्पना आहे.

यानिमित्त काल (मंगळवारी) विविध शासकीय कार्यालयात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रकरणी नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलीस उपअधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर येथे कराव्यात, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, प्रत्येक कार्यालयात या सत्यनिष्ठा प्रतिज्ञेचे वाचन करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या. त्यानुसार, या सप्ताह कालावधीत, ‘आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि समाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सर्व भागधारक जसे की सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.

प्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकांबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.अंतत: मी शपथ घेतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन, जनहितामध्ये कार्य करेन,व्यक्तिगत वागणूकीत प्रमाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईल,’ या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी राज्यपाल महोदयांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. सुराज्य व सुशासन प्रक्रियेत भ्रष्टाचार एक मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे एकीकडे देशाच्या प्रगतीचा वेग तर खुंटतो, तर दुसरीकडे सामान्य गरजू नागरिक शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहतो. यास्तव सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांनी आपापले व्यवहार अधिकाधिक पारदर्शी ठेवावेत तसेच कर्मचारी व अधिका-यांनी समाजाप्रती, राज्याप्रती तसेच देशाप्रती आपल्भ्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवावी.

यंदाच्या दक्षाता जनजागृती सप्ताहाचा भर सतर्क भारत, समृध्द भारत निर्मितीसाठी वैयक्तिक तसेच संस्थात्मक योगदान दिले पाहिजे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्व जण भ्रष्टाचार मुक्त नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबध्द होऊ या. असे या संदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या संदेशात, नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या दरम्यान विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ते आपल्या संदेशात म्हणतात, ‘लोकहिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचारामुळे अडसर निर्माण होतो.

विकास कामांची गती मंदावते. त्यामुळे अशा जनजागृतीच्या उपक्रमातून नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेतील घटकांमध्येही जागरुकता आणणे आवश्यक ठरते. त्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम सर्वदूर आणि शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावेत. यातून जनता आणि प्रशासना दरम्यानचा विश्वास वाढीस लागून महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग आणखी प्रशस्त होईल. ‘

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24